*यंदाच्या रविंद्र करंडक वर कोल्हापूरच्या “ इट हॅपन्स ” एकांकीकेने नाव कोरले*

84031072_2898869463466604_6147241284646993920_o

*यंदाच्या रविंद्र करंडक वर कोल्हापूरच्या “ इट हॅपन्स ” एकांकीकेने नाव कोरले*

*आंतरराज्य स्तरीय रविंद्र करंडक खुल्या एकांकिका स्पर्धेचा निकाल*

*आसावरी नागवेकर उत्कृष्ट अभिनय स्त्री पात्र तर प्रमोद पुजारी उत्कृष्ट अभिनय पुरुष पात्र*

*सुदर्शन खोत उत्कृष्ट लेखक तर अभिजित जाधव उत्कृष्ट दिग्दर्शक*

शिक्षण विकास मंडळ संचलित देवगड कॉलेज नाट्यशाखेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराज्य स्तरीय रविंद्र करंडक खुल्या एकांकिका स्पर्धेमध्ये सर्वच आघाड्यांवर भरीव कामगिरी करून कोल्हापूर येथील गायन समाज देवल क्लबच्या “इट हॅपन्स” (It Happens) एकांकिकेने बाजी मारली. यामध्ये रत्नागिरी येथील एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाच्या “वन डे सेलिब्रेशन” (One Day Celebration) एकांकिकेने द्वितीय तर मुंबई येथील मगाधन ग्रुपच्या “द एक्सिक्यूशनर” (The Executioner) एकांकिकेने तृतीय क्रमांक पटकावला. प्रेक्षक पसंती म्हणून मुंबईच्या पाटकर-वर्दे महाविद्यालयाच्या “पैठणी” या एकांकिकेचा गौरव करण्यात आला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रहास मर्गज व चंद्रकांत पाळेकर, सदस्य शैलेश महाडिक, व्ही. सी. खडपकर, प्र. प्राचार्या डॉ. सौ. सुखदा जांबळे, उपप्राचार्य कुर्लीकर, पर्यवेक्षिका वालावलकर, सभासद उमेश महाडिक, परीक्षक अजय गटलेवार व राजेश कोळंबकर हे उपस्थित होते.

वैयक्तिक परितोषिकांमध्येही “इट हॅपन्स” मधील कलाकारांनीच बाजी मारताना उत्कृष्ट अभिनयाच्या स्त्री व पुरुष भूमिकेचा मान अनुक्रमे आसावरी नागवेकर व प्रमोद पुजारी यांना मिळाला. उत्कृष्ट अभिनयाच्या स्त्री पात्रासाठी “पैठणी” मधील ज्ञानदा खोत हिला उत्तेजनार्थ प्रथम तर “निर्वासित” मधील जान्हवी विरमुळे हिला उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक मिळाला. तसेच उत्कृष्ट अभिनयाच्या पुरुष पात्रासाठी “वन डे सेलिब्रेशन” मधील गणेश राऊत याला उत्तेजनार्थ प्रथम तर “द ट्रान्स्फर ऑफ पॉवर” मधील सचिन वळंजू याला उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक मिळाला. “इट हॅपन्स” एकांकीकेमधील सुदर्शन खोत याला उत्कृष्ट लेखक म्हणून तर श्रेयस-अनुपम-संकेत यांना उत्कृष्ट संगीत हा बहुमान देऊन सन्मानित करण्यात आले. “निर्वासित” मधील देवेन कोळंबकर याला उत्कृष्ट नेपथ्य, “वन डे सेलिब्रेशन” मधील तन्मय राऊत याला उत्कृष्ट प्रकाशयोजना तर “द एक्सिक्यूशनर” मधील अभिजित जाधव याला उत्कृष्ट दिग्दर्शकचा पुरस्कार देण्यात आला. या सर्वांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

स्पर्धेत मुंबई, कोल्हापूर, रत्नागिरी, मालवण येथून एकूण दहा संघ सहभागी झाले होते. ही राज्यस्तरीय स्पर्धा तीन दिवसांत पार पडली, तिला देवगड येथील नाट्यरसिकांनी उदंड प्रतिसाद दिला. प्रथम क्रमांकास १५ हजार, द्वितीय क्रमांकास १० हजार आणि तृतीय क्रमांकास ७ हजार व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. तसेच लेखन, अभिनय व संगीत अशा तीनही आघाड्यांवर उल्लेखनीय कामगिरी करीत विजेत्या ठरलेल्या गायन समाज देवल क्लबच्या “इट हॅपन्स” या एकांकिकेसाठी मान्यवरांच्या हस्ते फिरता चषक प्रदान आला.

Leave us a Comment