विद्यार्थ्यांच्या नोकरीसाठी आय. टी. कंपनीबरोबर सामंजस्य करार

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी देवगड महाविद्यालयाचा उपक्रम – विद्यार्थ्यांच्या नोकरीसाठी आय. टी. कंपनीबरोबर सामंजस्य करार
देवगड महाविद्यालयाने सन २०१६-१७ च्या प्रथम सत्रात अनेक विद्यार्थीकेंद्रित व समाजकेंद्रित उपक्रम राबविले. या उपक्रमांमध्ये आणखी एका महत्वपूर्ण उपक्रमाचा समावेश करताना विद्यार्थ्यांच्या भविष्यकालीन नोकरीची तरतूद व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन महाविद्यालयाने डोंबिवली येथील तंत्रज्ञान प्रायव्हेट लिमिटेड या आय. टी. कंपनीबरोबर सामंजस्य करार केला. महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. जी. टी. परुळेकर व कंपनीच्या वतीने कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. प्रग्नेश लोडाया यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. या करारानुसार नोव्हेंबर २०१६ ते जानेवारी २०१७ या कालावधीत महाविद्यालयातील तृतीय वर्षातील आय. टी., तसेच कॉम्प्युटर सायन्सच्या एकूण तीस विद्यार्थ्यांना सदर कंपनीच्या वतीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणानंतर या प्रशिक्षित विद्यार्थ्यांना सदर कंपनीत, तसेच अन्य कंपन्यांमध्ये प्राधान्याने नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.
याप्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. टी. परुळेकर म्हणाले की, आपल्याकडे आलेल्या विद्यार्थ्यांना केवळ पदवी शिक्षण देऊन चालणार नाही, तर भविष्यातील त्यांच्या नोकरीची तरतूदही करणे तितकेच महत्वाचे आहे. त्यादृष्टीने विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे हे यापुढे महाविद्यालयाचे महत्वपूर्ण ध्येय असेल. याला अनुसरूनच महाविद्यालयाने हा पहिला प्रयत्न केला आहे व यानंतरच्या कालावधीत असे अनेक करार करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असू ज्यातून विद्यार्थ्यांना नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतील.