देवगड महाविद्यालयाच्या इतिहासात प्रथमच विद्यार्थ्यांची एक तुकडी जाणार आर्मी ट्रेनिंगसाठी

army training devgad college

देवगड महाविद्यालयाच्या इतिहासात प्रथमच विद्यार्थ्यांची एक तुकडी जाणार आर्मी ट्रेनिंगसाठी

देवगड महाविद्यालयाच्या तज्ज्ञ समितीने मांडलेल्या आराखड्यानुसार गेल्या वर्षभरात देवगड महाविद्यालयाने आपल्या विद्यार्थ्यांसाठी अनेक प्रकारच्या वैविध्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन केले व त्यामध्ये विद्यार्थी, पालक व समाजातील अनेक घटकांनी आपला सकारात्मक सहभाग नोंदविताना या विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांचे मनापासून स्वागत केले. कारण माझ्या पाल्याचे भवितव्य हाच प्रत्येक पालकाचा प्रमुख उद्देश असतो आणि यासाठीच प्रत्येक पालक अतोनात श्रम व कष्ट करताना दिसून येतात. आपल्या पाल्याला पाहिजे ते मिळाले पाहिजे, त्याचे सर्वांगीण शिक्षण चांगल्या पद्धतीने पूर्ण झाले पाहिजे यासाठी प्रसंगी स्वत:च्या स्वप्नांचे बलिदान देण्यासही पालक पाठीपुढे पाहत नाही. अशा या परिस्थितीमध्ये एक महाविद्यालय म्हणून आपले कार्य काय तर ज्या अपेक्षेने पालक आपल्या पाल्यांना आपल्या या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेण्यासाठी पाठवितात, त्या त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणे हे इथे अत्यंत महत्वाचे ठरते आणि देवगड महाविद्यालयाने गेले वर्षभर पालकांच्या या अपेक्षा पूर्ण करण्याचा निश्चित प्रयत्न केलेला आहे.

गेले वर्षभर आपण अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन आपल्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले. DYF 2017 चे औचित्य साधून आपण ज्या व्यक्तीने भारतीय सेनेमध्ये अपार कौशल्य व पराक्रम दाखविला अशा मा. कर्नल पाटणकर यांना विद्यार्थ्यांसमोर प्रस्तुत केले. अपेक्षा अशी होती की त्यामध्ये आपल्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, राष्ट्रसेवा तर निर्माण होईलच, परंतु आर्मी मध्येही आपण कशा प्रकारे करिअर करू शकतो याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी हा त्यामागील प्रमुख उद्देश होता.

आज सदर उपक्रमाच्या आयोजनाच्या निमित्ताने असलेल्या आमच्या मूळ उद्देशाला मूर्त स्वरूप प्राप्त होताना दिसून येत आहे आणि देवगड महाविद्यालयाच्या इतिहासात प्रथमच विद्यार्थ्यांची एक तुकडी आर्मी ट्रेनिंग कॅम्पसाठी कर्नल अकॅडेमी, फलटण येथे दि. २५ मे २०१७ ते ०३ जून २०१७ या कालावधीमध्ये जाऊन त्याठिकाणी आर्मीमध्ये भरती होण्यासाठी लागणारे आवश्यक ट्रेनिंग घेणार आहे. सदर ट्रेनिंग मध्ये त्यांना आर्मी मध्ये भरती होण्यासाठी लागणार्‍या शारीरिक व बौद्धिक तंदुरुस्तीची व अन्य प्रकारच्या आवश्यक अशा सर्व गोष्टींचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

आजपर्यंत देवगड तालुक्यातील विद्यार्थी हे आर्मी करिअरपासून पूर्णपणे वंचित राहिले होते. आर्मी मध्येही करिअर करण्याच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत याची जाणीव व कुतूहल निर्माण करण्यासाठी आम्ही तज्ज्ञ समितीच्या मार्गदर्शनानुसार गेल्या दोन महिन्यांमध्ये महाविद्यालयामध्ये एक आर्मी कॅम्पेन राबविले व त्याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल निर्माण करून त्यांना आर्मी करिअरकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर विद्यार्थ्यांना सदर उपक्रमाविषयी माहिती देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांशी संबंध प्रस्थापित करून त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले व त्यानंतर सदर आर्मी ट्रेनिंग साठी जाणार्‍या तुकडीत समाविष्ट होणार्‍या विद्यार्थ्यांची नावे निश्चित करण्यात आली.

सदर उपक्रम हा देवगड महाविद्यालयाच्या आतापर्यंतच्या इतिहासात प्रथमच साकार होत असून पालकांनी आपल्या पाल्यांना ज्या उद्देशाने आमच्या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेण्यासाठी पाठविलेले आहे, त्यांच्या स्वप्नांची पूर्तता करण्याचा आमचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. यापुढील काळात पालकांची ही स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आम्ही अधिक जोमाने आणि उत्साहाने कार्यरत राहू हे निश्चित..!

धन्यवाद..!

Related Blogs

Leave us a Comment