ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांची देवगड कॉलेजला भेट

- Posted by admin
- Posted in Programmes
ज्येष्ठ साहित्यिक व समाज सुधारक मा. डॉ. अनिल अवचट हे कांदळवनाच्या अभ्यासासाठी आले असताना त्यांनी देवगड महाविद्यालयाला भेट देऊन विद्यार्थी, प्राध्यापक, प्राचार्य व संस्था सदस्यांशी संवाद साधला. यावेळी अवचट यांनी विद्यार्थी व प्राध्यापकांच्या विविध प्रश्नांना खुमासदार शैलीत उत्तरे दिली.
यावेळी स्वत:च्या जीवनकार्याचा आढावा व माणसाने कसे असावे याविषयी प्रामुख्याने त्यांनी आपले विचार मांडले. बर्नार्ड शॉ यांच्या एका वाक्याचा वाक्याचा उल्लेखनीय उच्चार करताना ते म्हणाले की, मी फार मोठा माणूस झालो असतो पण माझ्या आई – वडीलांनी मला शाळेत घातले. त्याच अनुषंगाने मी माझ्या मुलींना त्या म्हणेपर्यंत शाळेत घातले नाही आणि शाळेत घातले तेही झोपडपट्टीमधील शाळेत घातले. कारण त्यांना सुख काय आहे हे माहिती आहे, पण त्याचबरोबर दु:ख काय असते तेही कळाले पाहिजे. माणसाने स्वत:ची दृष्टी उघडी ठेऊनच ज्ञान ग्रहण केले पाहिजे. यावेळी त्यांनी वर्णभेद, जातीभेद, वर्गभेद यांना माझ्या जीवनात कोणतेही स्थान नाही याचा आवर्जून उल्लेख केला. साहेब व शिपाई हा फरक मला चालत नसल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी ते पुणे येथे चालवत असलेल्या ‘मुक्तांगण’ या त्यांच्या व्यसनमुक्ती केंद्राच्या कार्याचा आढावा घेताना त्यांनी सांगितले की, याठिकाणी व्यसनमुक्त झालेली माणसेच प्रबोधनासाठी येतात व ते स्वत:च मी पूर्वी कसा होतो व आता माझ्यात कशा प्रकारे परिवर्तन झाले आहे हे सांगतात. अंतिमत: त्यांनी आपल्या जीवनात पत्नी व मुलींनी कशाप्रकारे मोलाची साथ दिली याचाही आवर्जून उल्लेख केला.
यावेळी त्यांनी प्राचार्य व संस्था सदस्य यांच्याशीही संवाद साधला.