डॉ. भालचंद्र मुणगेकर यांचा देवगड महाविद्यालयातील विद्यार्थी, पालकांशी संवाद..

bhalchandra_mungekar_devgad

डॉ. भालचंद्र मुणगेकर यांचा देवगड महाविद्यालयातील विद्यार्थी, पालकांशी संवाद..

राज्यसभेचे माजी खासदार, नियोजन आयोगाचे माजी सदस्य, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू अशा अनेक क्षेत्रात अमूल्य योगदान दिलेल्या व आजही राजकीय, सामाजिक, आर्थिक व वैचारिक क्षेत्रात अतुलनीय कार्य करीत असलेल्या डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी आज देवगड महाविद्यालयात येऊन विद्यार्थी, पालक, प्राध्यापक व संस्था पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी देवगड महाविद्यालयात एकूण चार उपक्रमांच्या माध्यमातून आपले विचार प्रकट केले. पहिल्या उपक्रमात त्यांनी विद्यार्थी व पालकांशी संवाद साधताना विद्यार्थ्यांमध्ये सॉफ्ट स्कील्स विकसित करणे का महत्वाचे आहे याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी लहानपणी नारळ विकणाऱ्या एका मुलाचे १७ राजकीय पक्षांनी एकत्र येऊन राष्ट्रपती पदाच्या उमेदवारासाठी नाव सुचवावे याशिवाय आयुष्यात वेगळे काय कमवायचे आहे, असे सांगताना त्यांच्या भावना अनावर झाल्या. यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याशी आपला असलेला ऋणानुबंध व्यक्त केला. शिवाय तारामुंबरी पूल होण्यासाठी केलेले प्रयत्नही व्यक्त केले.

दुसऱ्या उपक्रमात त्यांनी महाविद्यालयातील बी.एम.एस., बी.बी.आय. व कॉमर्सच्या विद्यार्थ्यांशी अर्थशास्त्र या विषयावर व्याख्यान देताना ग्रामीण भारताच्या दृष्टीने अर्थशास्त्राची व्याख्या मांडण्याचा प्रयत्न केला. यामध्ये काळानुरूप व स्थळानुरूप बदलणारी ग्रामीण अर्थव्यवस्था, अलीकडील काळामध्ये पर्यटन, कृषी व माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेत झालेले परिवर्तन याविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

प्राध्यापक व प्राचार्यांशी संवाद साधताना नॅकच्या दृष्टीने करावयाची तयारी, विद्यार्थ्यांच्या प्रती एक शिक्षक म्हणून आपली भूमिका व संस्था पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना संस्थांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान व शैक्षणिक संस्थांची कार्ये याविषयी मार्गदर्शन केले.

Related Blogs

Leave us a Comment