देवगड महाविद्यालयात रंगभूषा कार्यशाळा संपन्न

देवगड महाविद्यालयात रंगभूषा कार्यशाळा संपन्न

 महाराष्ट्रातील नामवंत रंगभूषाकार मा. बाळ जुवाटकर यांचे लाभले मार्गदर्शन

देवगड महाविद्यालयाच्या देवगड कॉलेज नाट्यशाखेच्या वतीने रंगभूषा कार्यशाळेचे आयोजन देवगड महाविद्यालयात करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी महाराष्ट्रातील नामवंत सिने व नाटक रंगभूषाकार मा. बाळ जुवाटकर हे तज्ज्ञ प्रशिक्षक म्हणून उपस्थित होते. विद्यार्थी व स्थानिक कलावंतांना महाविद्यालयीन व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे आपले कर्तव्य असल्याचे मत अलीकडील देवगड महाविद्यालयाच्या नूतन धोरणात नमूद आहे. याशिवाय सदर सर्व उपक्रम हे विद्यार्थ्यांनी ठरवायचे असून त्यांचे नियोजन, आयोजन, उपक्रमांची अंमलबजावणी ही सर्वस्वी विद्यार्थ्यांमार्फत केली जाते. या धोरणाची अंमलबजावणी करताना अलीकडे असे अनेक सांस्कृतिक उपक्रम महाविद्यालयामध्ये राबवून त्यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी व समाजाचा सहभाग वाढविण्यावर भर दिला जात आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून प्रस्तुत रंगभूषा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेसाठी देवगड महाविद्यालयातील विद्यार्थी, देवगड तालुक्यातील शिक्षक वर्ग व समाजातील या क्षेत्रातील कार्यरत व्यक्तींनी या कार्यशाळेत सहभाग नोंदविला. प्रस्तुत कार्यशाळेच्या निमित्ताने विद्यार्थी व स्थानिक कलावंतांना सिने व नाटक रंगभूषाकार मा. बाळ जुवाटकर यांच्याशी संवाद साधता आला. व्यावसायिक क्षेत्रातील रंगभूषेची माहिती, त्या दर्जाचे प्रात्यक्षिक कार्य व त्यासाठी घ्यावे लागणारे परिश्रम विद्यार्थी व समाजातील या क्षेत्रात कार्यरत व्यक्तींना या निमित्ताने अनुभवावयास मिळाले. या कार्यशाळेमध्ये व्यावसायिक दर्जाची अनेक प्रात्यक्षिके मा. बाळ जुवाटकर यांनी प्रस्तुत केली व उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांच्या उत्साहाचे व विद्यार्थ्यांनी केलेल्या उत्कृष्ट नियोजन व आयोजनाचे त्यांनी कौतुक केले. सर्व प्रशिक्षणार्थ्यांनीही सदर कार्यशाळेतील प्रशिक्षणाबाबत समाधान व्यक्त केले व या प्रशिक्षणाचा लाभ आम्हाला पुढील कार्यामध्ये निश्चित होणार असल्याचे मत सर्वांनी व्यक्त केले.

Related Blogs

Leave us a Comment