देवगड महाविद्यालयात सुरू होणार अतिजलद इंटरनेट सेवा

high speed internet in devgad college

देवगड महाविद्यालयात नवीन लीज लाईनच्या माध्यमातून सुरू होणार अतिजलद इंटरनेट सेवा

अलीकडे भारत सरकारने डिजीटल इंडियाचे स्वप्न हातात घेतले असून त्या दिशेने संपूर्ण शासकीय यंत्रणा कार्यरत असल्याचे आपणा सर्वांनाच जाणवते. शासकीय कार्यालये असोत, बँका असोत, खाजगी संस्था असोत सगळीकडेच डिजीटल इंडियाची कार्यवाही अतिशय जलद गतीने सुरू असल्याचे आपल्याला दिसते. देवगड महाविद्यालयाची आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षण पद्धतीकडे वाटचाल व्हावी आणि यासाठी महाविद्यालय कशा पद्धतीने डिजीटल झाले पाहिजे हे देवगड महाविद्यालयाच्या तज्ज्ञ समितीने आपले स्वप्न आपल्या आराखड्यात प्रस्तुत शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच मांडलेले आहे. ग्रामीण भागात कार्यरत असणारे एक महाविद्यालय म्हणून जेव्हा आम्ही या गोष्टींचा विचार करतो त्यावेळी असे निदर्शनास येते की, शासनाशी, विद्यापीठ अनुदान आयोगाशी, विद्यापीठाशी वारंवार वेबसाइट्स, ईमेल, सोशल मीडियाद्वारे करावा लागणारा संपर्क, अतिशय कॉन्फिडेन्शियल अशी ऑनलाईन पेपर पद्धती, आता यापुढील काळात सुरू होणारी ऑनलाईन पेपर तपासणी पद्धती, तसेच शिक्षक, विद्यार्थी, शिक्षण तज्ज्ञ, विचारवंत, सामाजिक तत्वज्ञ यांच्यामध्ये अलीकडील ऑनलाईन पद्धतीने वाढलेला संपर्क पाहता एका गोष्टीची कमतरता गेले वर्षभर आम्हाला जाणवत होती ती म्हणजे जलद इंटरनेट सेवेची कमतरता. संपूर्ण देवगड महाविद्यालयाचा विचार करता असे लक्षात आले की, महाविद्यालयात एकूण ५ इंटरनेट कनेक्शन उपलब्ध आहेत. ज्यावरती वर्षभरात जवळपास १ लाख रूपयांच्या आसपास खर्च केला जातो. परंतु तरीही योग्य व तत्पर सेवा आपल्याला उपलब्ध होत नाही.

त्यामुळे या कमतरतेवर मात करण्यासाठी आम्ही गेले वर्षभर कार्यरत होतो. यासाठी महाविद्यालयाच्या तज्ज्ञ समितीच्या माध्यमातून विविध कंपन्यांशी संपर्क साधून उपलब्ध तंत्रज्ञानाची माहिती घेत होतो. याच प्रयत्नांची यशस्विता म्हणजे आज आम्ही बीएसएनएल या भारत सरकारच्या दूरध्वनी कंपनीशी लिंक करून बँकांच्या धर्तीवर एक लीज लाईन महाविद्यालयात कार्यरत केलेली आहे. सदर लीज लाईनच्या माध्यमातून 10 MBPS स्पीडची इंटरनेट सेवा आम्हाला उपलब्ध होणार असून सदर सेवेसाठी आम्हाला वर्षभरासाठी सुमारे ५० ते ६० हजार रुपये एवढा खर्च अपेक्षित आहे जो यापूर्वी होणार्‍या १ लाख रुपये खर्चापेक्षा कमी आहे.

सदर लीज लाईनच्या माध्यमातून आम्हाला चांगल्या दर्जाची जलद इंटरनेट सेवा उपलब्ध होणार असून त्याद्वारे शासनाशी, विद्यापीठ अनुदान आयोगाशी, विद्यापीठाशी, अन्य महाविद्यालयांशी संपर्क साधणे सहज शक्य होणार आहे. याद्वारे आपण आपल्या महाविद्यालयाचे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षण पद्धतीकडे वाटचाल करण्याचे जे मुख्य स्वप्न आहे ते पूर्णत्वास येण्यास प्रामुख्याने मदत होईल. कारण याद्वारे आपणाला थेट ऑक्सफोर्ड, केंब्रिज अशा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठांशी थेट संपर्क साधणे शक्य होणार असून त्याद्वारे तेथील आंतरराष्ट्रीय दर्जाची व्याख्याने, अनेक जागतिक तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन थेट देवगड महाविद्यालयात सादर करणे शक्य होणार आहे. तसेच आपण थेट यु.जी.सी., मुंबई विद्यापीठ व अन्य शिक्षण संस्थांमध्ये सादर करण्यात येणारी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्याख्याने, चर्चासत्रे, परिसंवाद यांची देवाणघेवाण होण्यास मदत होणार आहे.

पुढील शैक्षणिक वर्षात या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संपूर्ण वर्षभरात विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे थेट मार्गदर्शन घेण्यासाठी विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांशी संपर्क साधून त्यांच्या वेळा व तारखा निश्चित करण्याचे काम सुरू आहे. तसेच इंटरनेटवर उपलब्ध असलेले विविध विषयांवरील कोर्सेस महाविद्यालयामध्ये सदर तंत्रज्ञानाद्वारे थेट शिकविले जावेत यासाठी तज्ज्ञ समितीचे प्रयत्न सुरू आहेत.

सदर इंटरनेट सेवेचा फायदा देवगड महाविद्यालयात शिकत असणार्‍या विद्यार्थ्यांसाठी, प्राध्यापकांसाठी, तसेच समाजासाठी अधिकाधिक कसा करून घेता येईल यासाठी यापुढील काळात आमच्या वतीने अधिकाधिक प्रयत्न केले जातील.

धन्यवाद..!

Related Blogs

Leave us a Comment