देवगड महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी वाचन कट्टा

reading cell devgad college

देवगड महाविद्यालयाचे नवीन शैक्षणिक धोरण – महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वाचन कट्टा सुरु

दि. ०६ जून, २०१६ च्या सयुंक्तिक सभेत तज्ज्ञ समितीने मांडलेल्या देवगड महाविद्यालयाच्या शैक्षणिक आराखड्यानुसार महाविद्यालयाचे कामकाज चालू आहे. प्रस्तुत वर्षी विविध प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा प्रयत्न महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आला आहे व यापुढेही असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी महाविद्यालय सदैव प्रयत्नशील राहील. महाविद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांची दखल म्हणून प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शनिवारी त्या महिन्यातील सर्वांचे एकत्रित वाढदिवस साजरे करणे, महाविद्यालयातील सर्व कार्यक्रमांचे आयोजन विद्यार्थ्यांनी करणे, विद्यार्थ्यांच्या विविध प्रकारच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक तसेच क्रीडा धोरण प्रस्तुत वर्षी ठरविण्यात आले. या उपक्रमांना विद्यार्थ्यांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून देवगड महाविद्यालयाच्या वतीने असे अनेक उपक्रम यापुढे राबविण्याचा मानस केला आहे.

याच नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत महाविद्यालयात वाचन कट्टा उपक्रमाला आज सुरुवात करून महाविद्यालयाच्या गार्डनमध्ये खुले ग्रंथालय सुरु करण्यात आले. विद्यार्थ्यांना अनेक प्रकारची शैक्षणिक, संदर्भ पुस्तके, वर्तमानपत्रे, मासिके याठिकाणी वाचनासाठी उपलब्ध करून देण्यात येतील. नैसर्गिक शिक्षण पद्धतीचा पुरस्कार आज आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. देवगड महाविद्यालयही आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षण पद्धतीकडे मार्गस्थ होत आहे. यासाठी आधुनिक स्पर्धेचा सामना करणारे सर्जनशील विद्यार्थी घडविणे हे देवगड महाविद्यालयाच्या नवीन शिक्षण पद्धतीचे प्रमुख धेय आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना वाचनाची आवड लावणे गरजेचे आहे. यासाठी हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.

 

 

प्रस्तुत वर्षी मुंबई विद्यापीठाने देवगड महाविद्यालयाच्या या गुणवत्तापूर्ण कार्याची दखल घेऊन युवा महोत्सव, अविष्कार व उडाण या मुबई विद्यापीठाच्या तिन्ही सर्वोत्तम कार्यक्रमांचे आयोजन करण्याची जबाबदारी देवगड महाविद्यालयाकडे दिलेली आहे.

यामध्ये युवा महोत्सवाचे यशस्वी आयोजन जुलै २०१६ मध्ये पार पडलेले आहे व अविष्कार चे आयोजन मंगळवार दि. १३ डिसेंबर, २०१६ रोजी नियोजित आहे. प्रस्तुत उपक्रम हा ‘युनिव्हर्सिटी रिसर्च कन्व्हेक्शन – अविष्कार’ असा असून याअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी या उपक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. याअंतर्गत विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विज्ञान संशोधन प्रकल्पाचे पोस्टर्सच्या माध्यमातून प्रदर्शन व प्रकल्पाचे सादरीकरण केले जाणार आहे. सदर उपक्रमाचे उद्घाटन स. ९.०० वाजता होणार असून संध्याकाळपर्यंत सदर उपक्रम महाविद्यालयामध्ये चालेल. तरी आपण आपल्या उपलब्ध वेळेनुसार सदर उपक्रमाला अवश्य भेट द्यावी हि विनंती.

प्रस्तुत दिवशी मुंबई विद्यापीठाचे मा. कुलगुरू कुडाळ महाविद्यालयात येणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविद्यालयांच्या प्रचार्यांसोबत बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी मी सदर अविष्कार उपक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर सदर बैठकीसाठी जाणार आहे. माझ्या अनुपस्थितीत माझे अन्य सहकारी याठिकाणी उपस्थित असतील. देवगड महाविद्यालयाने या शैक्षणिक वर्षापासून प्रथमच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी स्पोर्ट्स पॉलिसी तयार केली असून त्याअंतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना खेळांमध्ये जास्तीत जास्त सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार खेळांमध्ये सहभागी होता यावे व खेळामध्ये आवड असणार्‍या विद्यार्थ्यांना खेळासाठी एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे हा त्यामागील महत्वपूर्ण उद्देश आहे. त्यासाठी फूटबॉलसारखा खेळही यावर्षी सुरू करून त्यासाठी तज्ज्ञ प्रशिक्षकांची नियुक्तीही करण्यात आली. त्याचप्रमाणे अन्य खेळांसाठीही चांगले वातावरण व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालय प्रयत्नशील आहे.

देवगड महाविद्यालयाच्या याच प्रयत्नांची परिणीती म्हणजे नुकत्याच दि. २१ व २२ नोव्हेंबर २०१६ रोजी जिल्हा क्रीडा संकुल ओरोस येथे पार पडलेल्या कोल्हापूर विभागीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेत कादंबरी यादव या देवगड महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीची राज्यस्तरीय टेबल टेनिस निवड चाचणी स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. कादंबरी यादव ही देवगड महाविद्यालयाच्या कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी असून तिची १९ वर्षाखालील मुलींच्या वयोगटात निवड झालेली आहे. सदर राज्यस्तरीय टेबल टेनिस निवड चाचणी स्पर्धा ही नाशिक येथे संपन्न होणार असून तिच्या या निवडीबद्दल सगळीकडून तिचे विशेष अभिनंदन होत आहे.

Related Blogs

Leave us a Comment