‘विज्ञान आणि धर्म’ या विषयावर डॉ. सिद्धीविनायक बर्वे यांंचा संवाद

science vs religion devgad college

जैव तंत्रज्ञान हे मानवी जीवनास एक वरदान डॉ. सिद्धीविनायक बर्वे

देवगड महाविद्यालयात विज्ञान आणि धर्म या विषयावर बोलताना साधला संवाद

मुलुंड येथील जैवविविधता संशोधन केंद्र व वझे केळकर कॉलेजचे वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख, तसेच अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शिक्षण संस्थांचे व कंपन्यांचे सल्लागार म्हणून कार्यरत असलेले डॉ. सिद्धीविनायक बर्वे यांनी मुंबई विद्यापीठाच्या वतीने देवगड महाविद्यालयात ‘विज्ञान आणि धर्म’ या विषयावर विद्यार्थी, प्राध्यापक व मान्यवर व्यक्तींशी संवाद साधताना जैव तंत्रज्ञान हे मानवी जीवनास एक फार मोठे वरदान असल्याचे मत मांडले.

याप्रसंगी संवाद साधताना त्यांनी ब्रम्हांडाच्या उत्पत्तीपासून ते पृथ्वीवरील मानवाच्या उत्क्रांतीचा इतिहास उलगडून सांगताना अनेक शास्त्रज्ञांचे दाखले व अनेक उदाहरणे देऊन सोप्या व सहज भाषेत विषयाचे सादरीकरण केले. विविध धर्मातील मानवाच्या व्युत्पत्तीच्या सिद्धांताबाबत व विविध प्रकारच्या वनस्पती, प्राणी व मानव यांची गुणसूत्रे व त्यातील साधर्म्य याविषयी चर्चा केली. तसेच भविष्यातील मानवी जीवनाचा वेध घेताना मानवाची दीर्घायुष्याकडे होत असलेली वाटचाल व अवयव रोपण यामधील जैव तंत्रज्ञानाचे असलेले अविभाज्य योगदान विशद केले व त्या अनुषंगाने उपस्थितांच्या अनेक प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली.

मुंबई विद्यापीठाने नुकतेच १६० व्या वर्षात पदार्पण केल्याचे औचित्य साधून मुंबई विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील सर्व महाविद्यालये, तेथील सर्व विद्यार्थी व या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचून ज्ञानाची क्षितिजे अधिक विस्तारीत करण्याचा निर्धार मुंबई विद्यापीठाने प्रस्तुत वर्षी केलेला असून याच उपक्रमांतर्गत मुंबई विद्यापीठाच्या वतीने देवगड महाविद्यालयात सदर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

Related Blogs

Leave us a Comment