महिलांचा लैंगिक छळ-डॉ. सुखदा जांबळे यांनी केले मार्गदर्शन

कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ संरक्षण अधिनियम २०१३ विषयी देवगड महाविद्यालयात कार्यशाळेचे आयोजन
डॉ. सुखदा जांबळे यांनी केले मार्गदर्शन
कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ संरक्षण (प्रतिबंध मनाई आणि निवारण) अधिनियम २०१३ विषयी देवगड महाविद्यालयात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देवगड महाविद्यालयाच्या अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षा डॉ. सुखदा जांबळे यांनी कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ संरक्षण (प्रतिबंध मनाई आणि निवारण) अधिनियम २०१३ या कायद्याविषयीची सविस्तर माहिती उपस्थितांना करून दिली. कायद्याचे नियम, सदर कायद्याला अनुरूप मा. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश, त्यांची होणारी अंमलबजावणी, सदर कायद्यामुळे महिलांना मिळालेली सुरक्षितता, सदर नियमांचे पालन न केल्यास होणार्या शिक्षा याविषयीचे सविस्तर मार्गदर्शन उपस्थितांना केले.
महाराष्ट्र राज्य महिला आयोग, महाराष्ट्र शासन व विद्यापीठे यांच्या वतीने दि. २७ फेब्रुवारी, २०१७ या एकाच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातील महाविद्यालयांमध्ये सदर कार्यशाळांचे आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आले होते. सदर निर्देशांना अनुरूप श्री. स. ह. केळकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, श्री. शां. कृ. पंतवालावलकर अध्यापक महाविद्यालय व श्रीमती. न. शां. पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालय या देवगड महाविद्यालयातील तिन्ही महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी यांच्यासाठी देवगड महाविद्यालयाच्या अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या वतीने सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.